पावसाळा आला की, मित्रांसोबत फिरणे तर आलेच….आणि पावसात फिरणे आले की मुंबईच्या जवळ म्हणून ठाणे ग्रामीण-म्हणजे आता पालघर जिल्हा तुमच्या लिस्टमध्ये आलाच….हिरवळ,खराखुरा लालमातीचा मात्र नितळ पाण्याने बनलेला चिखल,दुथडी भरून वाहणार्‍या नद्या,एरवी सोनेरी-पिवळ्या गवताने भरलेले मात्र पावसांत भरपूर ट्रेकर्सना आकर्षित करणारे ऐतिहासिक ट्रेड रूटवरील वॉच टॉव्हर्स म्हणून वापरले गेलेले गड-किल्ले आणि गोडी असेल,खारी असेल पण चविष्ट या शब्दाला पुरेपूर न्याय देणारी मच्छी खाणे करायचे झालेच, तर पालघर जिल्हा गाठणे आलेच….
पालघर जिल्ह्याला छान,स्वच्छ पाण्याचे, लांबच्या लांब आणि ‘सुरू’च्या झाडांनी नटलेले समुद्रकिनारेही लाभले आहेत. त्यातला एक मोठा आणि मच्छिमारांची सहकारी संस्था असलेला एक महत्त्वाचा किनारा. एक दीपगृहसुद्धा आहे इकडे. जुने ऐतिहासिक राम मंदिर आणि पाचवी की सहावीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकाचे फ्रंट पेजवर जसे एक चित्र होते, त्याच्याशी हुबेहूब मिळता-जुळता एक चौक आणि त्या चौकात उभ्या परिवहनाच्या बसेस.
आम्ही मित्र-मैत्रिणी या सातपाटी समुद्रकिनार्‍यावर जाण्यासाठी गावातील या चौकात उतरलो. आम्ही ज्या दिवशी गेलो तो एक ऐतिहासिक दिवस २२ जुलै २०१७. आमच्या राज्याच्या मोजक्या काही कर्तबगार मुख्यमंत्र्यांपैकी एकांचा वाढदिवस. त्यांच्या काही योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे सातपाटीसारखे पालघरमधील इतर किनारे टुरिझमच्या दृष्टीने विकसित करायचे.
तर आम्ही चौकात उतरून काहीच अंतरावर असलेल्या सातपाटी समुद्रकिनार्‍याचा रस्ता विचारला…..ते म्हणाले सरळ जा….लेडीज उजव्या बाजूला रहा…जेंट्स डाव्या बाजूला…..ऐकून थोडं वेगळं वाटलं….काही कळलं नाही, पण दिशा कळली आपल्याला पुरे म्हणून आम्ही पुढे निघालो….मस्करी, गंमती,गप्पा करत आम्ही किनार्‍याजवळ पोहोचलो….
पुढे जे काही दिसले किंवा अनुभवले ते फार विचित्र होते. म्हणजे त्या गोष्टीने आमच्या दोन मित्रांचे पाय थबकले आणि त्यांनी किनार्‍यावर येण्यासच नकार दिला. समोर इतका स्वच्छ समुद्र…लांब पसरलेला किनारा….पाऊस गालांत भरून आमच्याकडे पाहत असलेले काळे ढग….आणि किनार्‍यावर आपले शिंपले तसेच टाकून पाण्यात निघून गेलेल्यांचे वेगवेगळे शिंपले आणि हळूहळू पाण्यात निघालेले काही जीव असं सगळं. पण त्याव्यतिरिक्त घाण किंवा मुंबईतल्या किनार्‍यांना जसं गलिच्छ म्हणतात त्यातलं असं काहीच नाही. आम्ही तिघे किनार्‍यावर फार आतपर्यंत आलेलो होतो. मागे राहिलेल्या दोघांना आतही बोलावून पाहिलं, पण त्यांचे निर्णय झालेले, त्यांना ते काही पाहायचे नव्हते ज्याकडे दुर्लक्ष करून आम्ही तिघे हा सुंदर अनुभव घेत होतो…..
आम्ही पुन्हा त्या दिशेकडे पाहिले ज्यांकडे आत्तापर्यंत आम्ही दुर्लक्ष करत आलो….दिशा आता बदलल्या होत्या…..मगाशी त्या माणसाने डावीकडून जेंट्सनी जायचे होते….उजवीकडून लेडीजनी…..आम्हाला दिसत होतं त्यात डाव्या हाताला बायका किनार्‍याकडे तोंड करून टमरेलं घेऊन ‘बसलेल्या’ होत्या….आणि उजव्या हाताला पुरूष टमरेलं घेऊन तोंडात बिड्या पेट्वून किनार्‍याकडे तोंड करून निवांत बसलेले होते….
एका झटक्यात विद्या बालन आणि अनुष्कावर खर्च केलेलं स्वच्छतेचं बजेट मला फोल वाटलं….पुढील काही वर्षांत हे गाव टुरिझम गाव होईल….पण काहीजण माझ्या त्या दोन मित्रांसारखेच अश्या अनुभवामुळे वेशीवरच रहायचे पत्करतील……
दखल सरकारने घ्यायला हवी की जनतेने…..दिशा दाखवणार्‍याने की दिशांना बिघडवणार्‍याने…..मला माहीत नाही….मी तर बाबा दुर्लक्ष करून आनंद घेतो मला हव्या त्या सीनेरीचा…🤔

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s