घराची बेल वाजली, आणि गेल्याच महिन्यात वर्षाची झालेली काव्या धावत दाराच्या दिशेने गेली. मनालीने दार उघडले. आदित्य आला होता. पंधरा दिवसाच्या बिझनेस ट्रीपवरून घरी परत आल्यावर त्याने एक प्रकारचा नि:श्वास सोडला आणि तो सोफ्यावर बसला. मनालीच्या मागून काव्या आदित्यसमोर आली. सोफ्याला टेकून वरच्या दिशेने डोके करून डोळे मिटून बसलेल्या आदित्यच्या दिशेने पाहून काव्याने एक आवाज केला. बोळक्या चेहर्‍यावर हसू होतं आणि हातात चकलीचा एक चघळून मऊ केलेला तुकडा. ओठांच्या चारही बाजूला चकली पसरली होती. एकदा आवाज करून आदित्यने तिच्याकडे पाहिले नाही म्हणूना तिने पुन्हा तसाच आवाज केला. तरीही आदित्यकडून काहीच प्रतिसाद नाही. आता काव्याने 3-4 वेळा सलग तेच आवाज काढले. आत्तापर्यंत डोळे मिटून चेहर्‍यावर नुसतेच हसू ठेवून मुद्दाम प्रतिसाद ना दिलेल्या आदित्यने यावेळी भॉ!!! असा आवाज करत चेहरा काव्यासमोर आणला. काव्या जोरात हसली. आणि तिने हात आदित्यच्या दिशेने उचलून घेण्यासाठी वळवले. आदित्यने तिला तसंच उचलून घेतलं आणि तिचा चेहरा छान खुलला. तिने आदित्यच्या चेहर्‍याला चेहरा भिडवून ते हक्काचे लाड करून घेतले.

मनाली आतून चहा आणि थोडंफार काहीतरी खायचे घेऊन आली. तिला आज सुट्टी असल्यामुळे काव्याला आज बेबीसिटिंगमध्ये ठेवले नव्हते. आदित्य आणि काव्या त्यांचा आवडीचा खेळ खेळत होते. ‘पीकाबू’. खूप साधा सरळ खेळ, पण काव्याला त्यात जामच मजा येत असे. खेळ म्हणजे काय तर, तुम्ही दोघेही एकमेकांसमोरच आहात. पण तुम्ही तुमचा चेहरा झाकता आणी बाळ खिदळंत सुटतं. ए! भॉक! असं काहीतरी केलं की त्या बाळाला जाम आनंद होतो. हाच खेळ काव्या आणि आदित्य खेळंत होते. आदित्यसाठी त्यात काही एक्साइटिंग असे नव्हते. मात्र काव्याच्या त्या खिदळण्याने त्याला एक छान आनंद मिळत होता.

मनाली त्याच्यासमोर थोडावेळ बसली. तिने पाहिलं आदित्य छान फ्रेश वाटत होता. ते पाहून तिने आपलं बोलणं सुरू केलं. ‘’अरे! आई बाबा म्हणत होते, म्हणजे मला असं वाटतं, की त्यांचे श्रीलंकाचे बुकिंग आपणा केले तर….म्हणजे, एक सरप्राइझ सारखे काहीतरी….एक छान ट्रीप पण होईल त्यांची….म्हणजे असं मला वाटतं!!” आदित्य खेळता खेळताच,मनालीकडे न पाहता, “त्यांना श्रीलंका बघायचंच आहे का??,आय मीन, दुसरे कोणते लोकेशन,??…” मनाली, “ अरे हो,म्हणजे कसं ना, प्रेगनंसीच्या वेळेत, बाबांनी खूप खर्च केला होता, त्यामुळे म्हणले, म्हणजे मला असं वाटतं, की त्यांना जायचंच आहे तर आपण म्हणजे तुझ्याकडून एखादं सर्प्राइझ देऊ त्यांना!!” आदित्यने खेळता-खेळता मनालीकडे हसतमुखाने मान वळवली, आणि पुन्हा आता खुर्ची मागे जाऊन लपून बघणार्‍या काव्याकडे बघून ए!भॉक!! असं म्हणंत हसला…..तो ‘पीकाबू’ खेळंत होता.

मनालीला त्याच्या हसण्याचा नेमका अर्थ कळला नाही. खेळता खेळता काव्याने रिमोट हातात घेतला, तिच्याकडून टिव्ही सुरू झाला. टिव्हीवर एक रिपोर्टर जोरजोरात भांडत होता, आणि त्याखालून जाणार्‍या टिकर टेपवर त्या चॅनेलच्या मदर कंपनीचा शेअर 4% ने वधारलेला दिसत होता. आदित्यने त्या भांडणार्‍याकडे हसतमुखाने दुर्लक्ष केले आणि तो पुन्हा काव्याकडे वळला….तो “पीकाबू” खेळत होता.

आदित्यचा फोन खणाणला, त्याच्या बॉसचा फोन होता. आदित्यने ते पाहून तसाच तो फोन सायलेंट करून तो खेळण्यात मग्न झाला. काव्या त्याच्या कडेवर खिदळत होती. त्याने भरवलेले कुरमुरे, तोंडातल्या जेमतेम दोन दातांनी चघळत होती. त्याच्या फोन ना उचलण्याने, बॉसचा व्हॉट्सॅप मेसेज आला, “होप द ट्रिप वॉज फाइन, आय वुड नीड द मिनीट्स ऑफ युवर मीटिंग्ज एसॅप अ‍ॅन्ड मेल मी युअर कमिंग वीक्स प्लॅन बाय एंड ऑफ द डे!! इतक्या मोठ्या ट्रीपवरून आलेल्या आदित्यने तो मेसेज वाचला आणि रात्रीचे साडेनऊ वाजल्यानंतरसुद्धा ‘डे एंड’ ना झालेल्या बॉसची त्याला कीव आली. त्या विचाराने हसून त्याने फोन बाजूला ठेवला आणि तो काव्याचे गालगुच्चे घेऊन काहीतरी बोबड्या भाषेत बोलता झाला. तो ‘पीकाबू’ खेळत होता.

किराणा सामानाची डिलिव्हरी थोड्या वेळापूर्वीच आलेली होती. कारण थोडेफार सामान टेबलवरच राहिलेले दिसत होते. त्यातली टूथपेस्ट त्याने उचलून घेतली. चारकोल असलेली पेस्ट पाहून त्याला थोडे हसू आले. “काय गं मनाली, टूथपेस्ट चेंज???,” मनाली, “ अरे हो, आई लहानपणी काळ्या पावडरने दात घासायची, तिने मला पण तसाच सल्ला दिला, पण घरात काळी पावडर ठेवणं म्हणजे थोडं डाउनमार्केट वाटतं ना, म्हणून म्हणलं, लेट्स ऑर्डर धिस…” आणि हसली. आदित्यसुद्धा तसाच हसला, त्याला हसताना पाहून कडेवरच्या काव्याच्या गालातसुद्धा हसू फुललं, टूथपेस्ट्सुद्धा क्लास ठरवते हा विचार ऐकून आदित्यला वेगळेच वाटले, तरीही तो ‘पीकाबू’ खेळतंच होता.

पीकाबू या खेळाची खरी मजा तो आज अनुभवत होता. त्याला तो खेळ खर्‍या अर्थाने समजत होता. म्हणजे समोरच असलेली गोष्ट दुर्लक्ष करून त्याच गोष्टीपासून लपणे, म्हणजे वास्तव लपलेले नसून आपणच ते दुर्लक्षित करतो आणि मग हसतमुखाने त्यातून फक्त समोरच्याच्या चेहर्‍यावर आनंद टिकून रहावा, तो एक सहवास टिकून रहावा, उगाच वास्तवाची जाणीव करून देऊन असलेली शांतता भंग न करणे म्हणजेच पीकाबू, हे आदित्यला कळत चालले होते. कारण तो ‘पीकाबू’ खेळत होता.

——————-

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s